छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शासकीय निर्णयानुसार महापालिकेत पदोन्नती मिळाल्यानंतर विहीत कालावधीत त्यांना परिक्षा उत्तिर्ण होणे आवश्यक असते. मात्र पदोन्नतीने लिपीक पदावर काम करणार्या कर्मचार्यांची टायपिंगची परीक्षा घेतल्यानंतर ते नापास झाले. चार वेळा संधी देऊनही ते टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मनपा आयुक्तांनी ९ लिपिकांना पदावनत करत, त्यांना मूळ पदावर पाठविले. यात सहा शिपायांसह प्रत्येकी एका सुरक्षारक्षक, सफाई मंजूर आणि वॉचमनचा समावेश आहे.
महापालिकेत चतुर्थश्रेणी संवर्गात नोकरीला लागलेल्या कर्मचार्यांना पदोन्नती मिळाल्याने ते लिपीक-टंकलेखक झाले. दरम्यान, मनपा आयुक्तांनी ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली असता, अनेक लिपीकांना टायपिंग येत नसल्याचे दिसून आले आयुक्तांनी कंत्राटी कर्मचार्यांची टायपिंग परीक्षा घेतली, त्यात नापास झालेल्यांना कामावरून कमी केले. त्यानंतर महापालिकेत कायम सेवेतील लिपीकांची परीक्षा घेण्यात आली. त्यात नापास झालेल्या लिपीकांना ४ वेळा संधी देण्यात आली. या कालावधीत त्यांनी मराठी टायपिंग शिकणे अपेक्षित होते. मात्र ते परीक्षा काही उत्तीर्ण झाले नाहीत. अखेर नापास झालेल्या कर्मचार्यांना पदावनत का करण्यात येऊ नये, अशी नोटिस बजावून खुलासा मागविण्यात आला. त्याचा खुलासा समाधानकारक नसल्याने, १७ फेब्रुवारी रोजी आयुक्त जी. श्रीकांत यांनी ९ लिपिकांना पदावनत करण्याचे आदेश काढले.
वेतनवाढ रोखण्याचे आदेश
महापालिकेत लिपीक-टंकलेखक टायपिंग करता येणे अनिवार्य आहे. पदावर रुजू झालेल्यांना चार वेळा संधी देऊनही परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या १८ लिपीकांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी बुधवारी (दि.१७) काढले. मराठी टायपिंगची परीक्षा पास केल्यावरच त्यांना वेतनवाढ व पदोन्नती देण्यात येईल, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.












